उपाशी जगाचा पसा भीम होता
असा भीम होता, असा भीम होता.
नव्या माणसाचे नवे भक्त सारे
उफाळून उठले नवे रक्त सारे
अशा माणसांच्या नसा भीम होता.
गुलामी जगाची झुगारत होता
पुढे हात सारे उगारत होता
अशा काळजाचा ठसा भीम होता.
लोकशाहीर वामनदादा कर्डक.
Friday, November 23, 2007
असा भीम होता...
प्रकाशक : अमोल शिरसाट वेळ : 8:21:00 PM
Wednesday, November 21, 2007
आम्ही तुफानातले दिवे.
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.
हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे.
हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्याने मावळणारी जात आमुची नव्हे.
तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.
काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.
एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.
जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.
लोकशाहीर वामनदादा कर्डक.
प्रकाशक : अमोल शिरसाट वेळ : 2:45:00 PM
भीमरायाच्या मुला
तुडवाया टपले तुला,
वैराण रानच्या फुला
ही जाण असु दे तुला
रे भीमरायाच्या मुला.
भवताली वस्ती मधील,
जन आले मस्तीमधी
ते नडती आपुल्या भुला रे....
त्या उजाड माळावरी
कुणी काळी करनी करी
वन जळे आजुबाजूला रे....
सांगणे भीमाचे तुला,
सांभाळ तुझ्या घरकुला
सांभाळ प्राण आपुला रे....
लाडक्या भीमाच्या मुला
वामनच्या फुलत्या फुला
घे तळ हाताचा झुला रे....
लोकशाहीर वामनदादा कर्डक
प्रकाशक : अमोल शिरसाट वेळ : 2:16:00 PM
जरी संकटाची काळरात होती....
जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती.
पालवीत होते प्रकाशाचे गोळे,
चालवीत होते तुझे दोन डोळे,
प्रकाशाचे गाणे मनी गात होती....
अशी फौज माझी पुढे जात होती.
काळ्या काळजाची काळी काळदाती,
दात खात होती, पुढे येत होती,
तिचे काळे काळे, सुळे पाडण्याची
तुझी रग माझ्या मनगटात होती....
गणतीच माझी गुलामात होती
जिँदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती.
मला दावलेली तुझी पायवाट
झाली अता ती विकासाची वाट
वदे आज "वामन" कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती.
लोकशाहीर वामनदादा कर्डक
प्रकाशक : अमोल शिरसाट वेळ : 1:55:00 PM
