Wednesday, November 21, 2007

आम्ही तुफानातले दिवे.

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.


हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे.


हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्‍याने मावळणारी जात आमुची नव्हे.


तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.


काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.


एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.


जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.


लोकशाहीर वामनदादा कर्डक.

6 comments:

  1. खुप छान काव्यपंक्ती आहेत दादा

    ReplyDelete
  2. खूप छान ओळी आहे या काव्याच्या खूप काही शिकवून जातात 👌🏻🙏🏻

    ReplyDelete